children

लहान मुलांना कोरोना व्हायरसचा धोका किती?

काही दिवसांपूर्वी मुंबईल्या एका नवजात बाळाला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली होती. चेंबूर इथल्या खासगी हॉस्पिटलमध्ये प्रसूत झालेली महिला आणि तिच्या तीन दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याचं लक्षात आलं होतं. त्यानंतर हे हॉस्पिटल सील करण्यात आलं.
पण कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये झालेल्या टेस्ट नंतर या बाळाला लागण झाली नसल्याचं समोर आलं. मीडियामध्ये या प्रकारच्या बातम्याही आल्या.
मग प्रश्न असा आहे की नवजात बालकांना, बाळांना किंवा लहान मुलांना कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते का?
फेब्रुवारी महिन्यात चीनमध्ये एका नवजात अर्भकाला जन्मानंतर अवघ्या 30 तासातच कोरोना व्हायरसची लागण झाली होती. तिथल्या मीडियाने दिलेल्या बातम्यांनुसार हे बाळ 2 फेब्रुवारीला वुहानमध्ये जन्मलं होतं आणि कोरोनाची लागण झाल्यानंतर जगातलं सगळ्यात कमी वयाचं कोरोनाचं रूग्ण ठरलं.
बाळाच्या आईला प्रसुतीआधीच कोविड-19 चा संसर्ग झाला होता. बाळाला या रोगाचा संसर्ग कसा झाला, आईच्या पोटात असतानाच की जन्मल्यानंतर हे मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
उद्योगपती एलन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी ट्वीट करून म्हटलं की, लहान मुलांना कोरोना व्हायरसचा धोका नाही, ते त्यापासून सुरक्षित आहेत. मस्कच नाही, अनेकांना असं वाटतंय की नव्या कोरोना व्हायरसपासून लहान मुलांना काही धोका नाही. प्रौढांचा, विशेषतः वयोवृद्ध लोकांचा जीव घेणारा हा आजार लहान मुलांसाठी मात्र धोकादायक नाही असं काही तज्ज्ञाच्या संशोधनातून जाणवतंय.
तरीही लहान मुलांना गंभीर लागण झाल्याच्या बातम्याही पुढे आल्यात. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक देशांमध्ये शाळा बंद आहेत.
लहान मुलांना कोरोना व्हायरसची लागण नक्कीच होऊ शकते, ऑक्सफर्ड विद्यापीठात पेडियाट्रीक इन्फेक्शन अँड इम्युनिटीचे प्राध्यापक असणारे अँड्रयू पॉलार्ड सांगतात. पण त्यांना लागण झाली तरी त्यांच्या दिसणारी लक्षण साधी असतात.
फेब्रुवारी महिन्यात चीनमध्ये केलेल्या एका सर्वेक्षणात लक्षात आलं की त्यावेळी तिथे लागण झालेल्या 72314 पेशंटपैकी फक्त 2 टक्के पेशंट हे 19 वर्ष वयाखालील होते. तर अमेरिकेत याच काळात केलेल्या 508 लोकांच्या सर्वेक्षणात आढळलं की 19 वर्ष वयाखालच्या वयोगटात एकाचाही मृत्यू या रोगाने झाला नव्हता तर फक्त 1 टक्के मुलांना दवाखान्यात अॅडमिट करावं लागलं होतं.
ही टक्केवारी कमी असण्याचं कारण आपण लहान मुलांच्या पुरेशा टेस्ट केल्या नाही हेही असू शकतं असं साऊथ हॅम्प्टन चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये पेडिआट्रीक कन्सलटंट असणाऱ्या संजय पटेल यांना वाटतं. "मुळात आपण त्याच लोकांनी टेस्ट केलीये जे गंभीर स्वरूपाची लक्षण घेऊन हॉस्पिटल्समध्ये आले. यात लहान मुलांचा आकडा नगण्य आहे. त्यामुळे आताच्या आकडेवारीपेक्षा कितीतरी अधिक मुलांना लागण झालेली असू शकते," ते म्हणतात.

लहान मुलांमध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणं नाहीत?

सहसा लागण झालेल्या लहान मुलांमध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणं दिसत नाहीत तसंच त्यांना प्रौढांइतका त्रासही होत नाही. पण तरीही बेल्जियममध्ये एका 12 वर्षांच्या मुलीचा तर यूकेमध्ये 13 वर्षांच्या मुलाचा कोव्हिड-19 मुळे मृत्यू झाला आहे. चीनमधेही एका 14 वर्षांच्या मुलाचा नव्या कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.
एका चिनी अभ्यासातून जी माहिती समोर आली त्यावरून लक्षात आलं की लागण झालेल्यांपैकी दोन तृतीयांश मुलांमध्ये बारीक ताप, खोकला, घसा खवखवणे, सर्दी आणि शिंका अशी हलकी लक्षणं दिसून आली. एक तृतीयांश मुलांमध्ये न्युमोनियाची लक्षणं दिसून आली आणि अगदी थोड्या गंभीर स्वरूपाच्या केसेसमध्ये श्वास घ्यायला त्रास अशी लक्षणं दिसून आली.
हॅम्प्टन चिल्ड्रन्स हॉस्पिटलमधले तज्ज्ञ ग्रॅहम रॉबर्टस सांगतात की, "कोव्हिड-19 ची लागण झालेल्या लहान मुलांच्या श्वसनसंस्थेच्या वरच्या भागावर म्हणजे नाक, तोंड आणि घशावर परिणाम होतो, त्यामुळे त्यांच्या सर्दीसारखी लक्षणं दिसतात. पण व्हायरस त्यांच्या श्वसनसंस्थेच्या खालच्या भागात म्हणजेच श्वासनलिका, फुफ्फुसं आणि छातीत पोहचत नाही त्यामुळे न्यूमोनिया, श्वास घ्यायला त्रास किंवा इतर जीवघेणी परिस्थिती उद्भवत नाही."
ज्येष्ठ नागरिकांच्या तुलनेत लहान मुलांना कमी धोका का?
"हा व्हायरस इतका नवा आहे की याबद्दल फारसं काहीच माहीत नाही." रॉबर्टस सांगतात. एक असू शकतं की या व्हायरसला पेशीत शिरण्यासाठी पेशीच्या पृष्ठभागावरच्या प्रोटीनची गरज असते. कोरोना व्हायरस ACE -2 या एन्झाइमचा रिसेप्टर म्हणून वापर करून फुफ्फुसात शिरतात. लहान मुलांच्या श्वसनसंस्थेच्या खालच्या भागात मोठ्यापेक्षा कमी ACE -2 इन्झाइम असतात. त्यामुळे त्यांचा कोव्हिड-19 श्वसनसंस्थेच्या वरच्या भागातच मर्यादित राहातो.
यावरून लक्षात येईल की लागण झालेल्या मुलांमध्ये न्युमोनिया किंवा श्वास घ्यायला त्रास होणं यापेक्षा सर्दी, वाहतं नाक अशी लक्षणं का दिसतात.
पण फक्त एवढंच कारण नाही. अँड्रयू पॉलार्ड सांगतात, "जशी जशी आपली रोगप्रतिकारक शक्ती म्हातारी होते तसं तसं नवीन नवीन इंन्फेक्शन परतवून लावायची तिची क्षमता कमी होते. लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती तुलनेने नवी असते. पण असं असलं तरीही लहान मुलं इतर इन्फेक्शन्सला बळी का पडतात आणि त्यात त्यांचा मृत्यू का होतो याचं स्पष्टीकरण नाही.”
लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मोठ्यांपेक्षा वेगळ्या प्रकारे काम करते. बालवाडीत असलेल्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती रोज अनेक प्रकारचे इन्फेक्शन परतवून लावत असते त्यामुळे त्यांच्या शरीरात आधीपासूनच अनेक अँटीबॉडीज तयार असतात. म्हणूनच लहान मुलांमध्ये अनेकदा ताप आलेला दिसून येतो.
लहान मुलांना कोव्हिड-19 चं जीवघेणं संक्रमण न होण्याचं आणखी एक कारण म्हणजे सिटोकिन स्टॉर्म. गंभीररित्या आजारी असणाऱ्या प्रौढांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती आपली सगळी ताकद पणाला लावते. यालाच सिटोकिन स्टॉर्म असं म्हणतात. पण याने फायदा होण्यापेक्षा धोकाच निर्माण होतो, कारण सिटोकिन स्टॉर्ममुळे मल्टिपल ऑर्गन फेल्युअरचा धोका निर्माण होतो. दुसरीकडे लहान मुलांची प्रतिकारशक्ती जेष्ठापेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करत असल्यामुळे तसंच ती पूर्णपणे विकसित न झाल्यामुळे त्यांच्या शरीरात सिटोकिन स्टॉर्म्स तयार होत नाहीत.
पण कोव्हिड-19 चं संक्रमण झालेल्या मुलांमध्ये गंभीर लक्षण नसली आणि त्यांना याचा धोका नसला तरी ते इतरांना होणाऱ्या संसर्गाचं कारण नक्कीच बनू शकतात.
"हा खूप मोठा प्रश्न आहे. अनेकांना वाटतं की लहान मुलांना धोका नाही मग त्याबाबतीत काळजी करण्यासारखं काही नाही. ज्या लहान मुलांना क्रॉनिक इम्युनोडिफिशिएन्सी नाही त्यांच्याबाबतीत हे खरंही आहे. पण लहान मुलांमुळे कोव्हिड-19 चा कम्युनिटी स्प्रेड होऊ शकतो हे लक्षात घ्यायला हवं," रॉबर्टस सांगतात.

नवजात अर्भकांना जास्त धोका

चिनी संशोधकांना केलेल्या संशोधनानुसार नवजात अर्भकांना कोव्हिड-19 चा धोका असतो. कोव्हिड-19 चं संक्रमण झालेल्या 10 पैकी एका अर्भकामध्ये गंभीर लक्षणं दिसत असली तरी वय वाढल्यानंतर हे प्रमाण फारच कमी होतं. 3-5 या वयोगटातल्या संक्रमण झालेल्या 100 पैकी फक्त 3-4 मुलांमध्ये गंभीर लक्षणं दिसून आली.
कोरोना व्हायरसने आपलं आयुष्य मोठ्या प्रमाणावर व्यापलं आहे, त्यामुळे लहान मुलांना त्याची योग्य ती माहिती द्यायलाच हवी असं तज्ज्ञ सांगतात. "लहान मुलांना धोका नसला तरी या प्रसंगी आपण सगळ्यांचीच काळजी घेतली पाहिजे हे त्यांना समजावलं पाहिजे," फिनलंडमधल्या लहान मुलांच्या मानसोपचार तज्ज्ञ लिएना कार्लसन सांगतात.

Comments